`केज तालुक्यातील अतिवृष्टी बाधित इस्थळ गावास पोहोचला शेतकरी जनहित कामगार मंचचा शिधा`
केज | प्रतिनिधी
केज तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसापासून मुसळधार पावसामुळे धरणाच्या कडेला असलेल्या काही गावांना स्थलांतर करण्याची वेळ आलेली होती. केज तहसीलदार मा.श्री राकेश गिड्डे साहेब यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन, केज शहरातील व्यापारी बांधवांनी अल्पावधीत काही रक्कम जमा करून अतिवृष्टीने बाधित झालेल्या व स्थलांतर झालेल्या नागरिकांना मदत पोहोचवण्याचे अतिशय मोलाचे कार्य पार पाडले. यामध्ये अनेक संघटनांनी पुढाकार घेऊन मदतीचा हात पुढे केला. अडचणीच्या काळामध्ये माणूस म्हणून माणसांनी एकमेकांच्या कामी आले पाहिजे हा ध्यास मनामध्ये ठेवून अनेक नागरिकांनी मदतीचा पुढे केला. त्याच धर्तीवर शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी शासन दरबारी उभी राहणारी, पर्यावरण संरक्षण सर्वस्व मानणारी, आपल्या क्षेत्रामध्ये दोन लाख झाडे लावण्याचा संकल्प केलेली शेतकरी जनहित कामगार मंच ही सामाजिक संघटना पुढे आली. केज तालुक्यातील इस्थळ हे गाव बाराशे उंबऱ्यांचे असून गावाचा काही भाग अतिवृष्टीमुळे पाण्यामध्ये गेला होता, येथील काही लोकांना स्थलांतरित करण्यात आले होते. त्या स्थलांतरित केलेल्या लोकांना शेतकरी जनहित कामगार मंचच्या माध्यमातून ०४ ऑक्टोबर २०२५ रोजी शिधा वाटप करण्यात आला. यावेळी गावचे उपसरपंच श्री निखिल काळदाते साहेब, गावचे तलाठी, ग्रामसेवक व नागरिकांनी गरजू व्यक्तींना सदरील शिधा शिस्तबद्ध पद्धतीने वाटप करण्यास पुढाकार घेऊन मदत केली असल्याचे शेतकरी जनहित कामगार मंचाचे केज तालुका अध्यक्ष श्री अतिक सय्यद यांनी सांगितले.
यावेळी शेतकरी जनहित कामगार मंचाचे श्री जितेंद्र गायसमुद्रे, श्री पांडुरंग कसबे, श्री श्रीपती सोळुंके, श्री शिवाजी राठोड, श्री इंद्रजीत डोंगरे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.




