वडवणीतील आक्रोश मोर्चाला बीड जिल्ह्यातील सर्व गायरानधारकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे : आझाद क्रांती सेना
केज प्रतिनिधी : पी.डी.कसबे
येत्या १० जुलै २०२५ रोजी गुरुवारी बीड जिल्ह्यातील वडवणीमध्ये तहसील कार्यालयावर सबंध जिल्ह्यातील भूमिहीन व गायरान धारकांचा आक्रोश मोर्चा निघणार आहे. या मोर्चाची जोरदार तयारी सुरू असून सबंध जिल्ह्यातील भूमिहीन व गायरान धारकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आझाद सेना प्रमुख राजेश घोडे यांनी केले आहे.
आपल्या देशाला स्वतंत्र मिळून आज सत्याहत्तर वर्षे लोटली आहेत. भारत देश स्वतंत्र झाला त्यावेळी साधनसंपत्तीचे वाटप होऊन पाकिस्तानला जमिनीचा ठराविक भाग देण्यात आला. सरकारी साधनसंपत्तीचा हिस्सा त्यांना त्यावेळी देण्यात आला. परंतु भारत देशातच असणाऱ्या दीन दलित, अल्पसंख्याक, अनुसूचित जाती जमाती, भूमिहीन नागरिकांना मात्र सरकारी साधनसंपत्तीचा किंवा सरकारी बंजर जमिनीचा एक तुकडादेखील द्यावा असे सरकारला वाटले नाही. आपल्या हक्कांबाबत जागृत झालेल्या या भूमिहीन लोकांनी जर त्या सरकारी गायरान जमिनी कसण्यासाठी घेतल्या असतील, त्यातून उत्पन्न घेऊन आपली उपजीविका भागवीत असतील, सरकारला त्यातून कर मिळवून देत असतील तर सरकारने निश्चित त्यांना शेतकऱ्यांचे सर्व लाभ व हक्क दिले पाहिजेत. त्यांना सात बारा दिला पाहिजे. तलाठ्यानंमार्फत त्यांचे पिक पंचनामे करून सरकार दरबारी त्यांच्या नोंदी ठेवल्या पाहिजेत. त्यांना भारतीय शेतकऱ्यांचा दर्जा देऊन, सन्मान करून पिक विमा असेल, बँक कर्ज असेल, शेतकरी सन्मान योजनेचा लाभ असेल त्याचबरोबरीने शेतकऱ्यांना सरकारी संरक्षण देणे काळजची गरज असताना सुद्धा खाजगी कंपन्यांकडून, धनदांडग्याकडून गायरान धारकांच्या जमिनी हडप केल्या जात आहेत. यामुळे सरकार आपले मायबाप नसून दुश्मन आहेत की काय? अशी भावना आज भूमिहीन व गायरान धारकांची झालेली असल्यामुळे “गायरान आपल्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे” अशी हाक देत सबंध जिल्ह्यातील गायरान धारकांना एकत्र आणण्यासाठी आझाद क्रांती सेनेचे बीड जिल्हाध्यक्ष नाना भिसे, उपाध्यक्ष कृष्णा पाटोळे, जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष तसेच सर्व पदाधिकाऱ्यांनी वज्रमूठ बांधलेली आहे.
