धनगर आरक्षणासाठी मुंबईला आंदोलनासाठी जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी द्या,खा.बजरंग सोनवणे यांचे संचालकांना पत्र

केज/प्रतिनिधी :- एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी होत असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातून मुंबईतील आझाद मैदान येथे जाणाऱ्या धनगर समाजाच्या वाहनांना टोलमाफी देण्यात यावी, असे पत्र खा.बजरंग सोनवणे यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महा मंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना पत्र पाठविले आहे.यापत्रात म्हटले आहे की,एस.टी.आरक्षणासाठी दीपक बोराडे यांच्या नेतृत्वाखाली दि.१७ जानेवारी २०२६ रोजी जालना येथून धनगर समाज निघत असून मुंबईतील आझाद मैदान येथे भव्य आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.या आंदोलनात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्राच्या विविध भागातून हजारो धनगर बांधव मोठ्या संख्येने खासगी वाहनांनी मुंबई कडे रवाना होणार आहेत. या पार्श्वभूमीवर आझाद मैदान,मुंबई येथे जाणाऱ्या व महाराष्ट्रातून येणाऱ्या धनगर बांधवांच्या वाहनांकडून कोणत्याही प्रकारचा टोल आकारला जाऊ नये, तसेच याबाबत सर्व संबंधित टोल नाक्यांना तातडीच्या सूचना देण्यात याव्यात, असे खा.बजरंग सोनवणे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.लोकशाही मार्गाने होणाऱ्या आंदोलनात सहभागी होणाऱ्या नागरिकांना कोणताही आर्थिक अडथळा येऊ नये,तसेच आंदोलन शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडावे,यासाठी प्रशासनाने सहकार्य करणे आवश्यक असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.दरम्यान, या मागणीमुळे आंदोलना साठी जाणाऱ्या धनगर समाजातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.खा.बजरंग सोनवणे यांनी कायम सर्वसमावेशक भुमिका घेतलेली आहे.धनगर बांधवांच्या आंदोलनात सहभागी होणाऱ्या धनगर बांधवांच्या वाहनांना टोलमाफी मिळावी, यासाठी त्यांनी सर्वप्रथम संबधित विभागाला पत्र दिले आहे.




