खासदाराच्या माजी नगरसेवकाचा महाप्रताप २५ गुंठे जमीन न दिल्याने केले उपोषण
२५ गुंठे गायरान जमीन हडप करायला केज येथील मोठ्या हस्तीचा हात आहे का?-कार्यकर्त्यांचा सवाल
खासदार सोनवणे यांच्या समर्थकाची ऑडिओ क्लिप झाली व्हायरल!
केज | प्रतिनिधी
खा.बजरंग सोनवणे यांचे खंदे समर्थक माजी नगरसेवकाचा महाप्रताप २५ गुंठे जमीन न दिल्याने उपोषण केले होते.
२५ गुंठे गायरान जमीन हडप करायला केज येथील मोठ्या हस्तीचा हात आहे का? असा सवाल पत्रकार परिषदेत दलित अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे. तसेच या पत्रकार परिषदेत सर्वे नंबर ३०/२ मधील गायरान जमीन बळकवण्याचा संवाद रुपी ऑडिओ क्लिप व्हायरल करून खासदार सोनवणे यांचे खंदे समर्थक माजी नगरसेवक कपिल मस्केचा महाप्रताप उघडकीस आणला आहे. सदर समितीचे पदाधिकारी खासदार सोनवणे यांची येत्या दोन दिवसात भेट घेऊन सदर प्रकरणाचा जाब विचारणार आहेत असे पत्रकार परिषदेमध्ये बोलताना पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
गेल्या कित्येक वर्षापासून केज- बीड रोडवरील रमाई नगर वस्तीसाठी केज तालुका दलित अन्याय अत्याचार निर्मूलन समितीसह दलित चळवळीतील युवक व कार्यकर्ते आणि समाज बांधवांचा संघर्ष चालू आहे. पाठीमागील काही महिन्यापूर्वी सदर समितीच्या कार्यकर्त्यांनी रमाई नगर येथील नागरिकांना न्याय मिळावा यासाठी प्रयत्न केला परंतु प्रशासन स्तरावरून कसल्याच प्रकारे रमाई नगरवासी यांना न्याय मिळाला नाही म्हणून सदर समितीच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सदर प्रकरणी तहसीलदार यांनी दखल घेऊन रमाई नगर येथील अतिक्रमण काढण्याचे स्थगित केले. परंतु खासदार सोनवणे यांचे खंदे समर्थक माजी नगरसेवक कपिल मस्के यांनी ही अनधिकृत जमीन आपल्या नावाने करून घेण्यासाठी अनाधिकृत जमीन मालक यांना सर्वे नंबर ३०/२ मधील गायरान जमीन २५ गुंठे दे व आपण दोघे मिळून खाऊ आशा आशयाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिप मध्ये माजी नगरसेवक कपिल मस्के यांनी अनधिकृत मालक यांच्याशी २५ गुंठेवर सदरील डिल केली; परंतु मान्य न झाल्यामुळे माजी नगरसेवकाने आमरण उपोषण केले, असा आरोप दलित संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी शासकीय विश्रामगृह केज येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केला. याअगोदर असेच उपोषण करून ५० हजार रुपये घेतल्याची ऑडिओ क्लिप आजच्या पत्रकार परिषदेत लखन हजारे, अशोक गायकवाड, रोहित कसबे, शरद धीवार यांनी पत्रकार परिषदेत वाजवून दाखवली. यावरून असे दिसून येते की, केज शहरातील माजी नगरसेवक यांच चाललय तरी काय? या मागे केज शहरातील मोठ्या हस्तीचा हात आहे का? तसेच मोठ्या हस्तीचा हात असल्याचेही दबक्या आवाजात बोलले जात आहे. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना दलित अन्याय अत्याचार निर्मुलन संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की, आपल्या जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारा दरम्यान याच माजी नगरसेवकाने रमाई नगर भागातील लोकांना आश्वासित केले होते की, खासदार बजरंग बप्पा निवडून आल्यानंतर सदरील जमिनी आपल्या रेकॉर्डला लावून घेऊ, असा शब्द दिला परंतु बजरंग सोनवणे खासदार होऊन दीड वर्षे झाले, तरी या जागेचा कुठल्याही प्रकारे निर्णय न लावता माजी नगरसेवक कपिल मस्के यांनी स्वतःच्या फायद्यासाठी गोरगरीब जनतेला वेड्यात काढून वेठीस धरत राजकारण करत असल्याचे समोर येत आहे. रामाई नगर वासियांना गायरान जमीन नावावर करून देण्याचे गाजर दाखवून कपिल मस्के राजकारण करत आहे. त्याचप्रमाणे राजकारणामध्ये स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी आणि स्वतःच्या फायद्यासाठी हा गायरान जमीन हडप करण्याचा प्रयत्न करीत आहे. संबंधिताना सोबत घेऊन राजकारण करीत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी बोलताना केला आहे. सदर गायरान जमीन हडप करण्याच्या उद्देशाने त्या नगरसेवकाला आक्काच्या आदेशाने आमरण उपोषणाला बसायला लावले होते काय? असे व्हायरल ऑडिओ क्लिप पाहून व ऐकून शहरातील नागरिकांतुन दबक्या आवाजात ऐकण्यास मिळत होते व तशा जोरदार चर्चा चालू होत्या. सदर ऑडिओ क्लिप हि प्रसार माध्यमावर वाऱ्यासारखी व्हायरल झाल्यामुळे केज शहरासह तालुक्यात उलट सुलट चर्चेला उद्यान आले आहे.




