जागतिक पर्यावरण दिनानिमित्त किल्ले-धारूर न्यायालय परिसरात वृक्षारोपण
पर्यावरण संवर्धनाचा संदेश; न्यायालय परिसरात आंबा, चिंच, पेरू व जांभूळच्या रोपांची लागवड

किल्ले-धारूर, प्रतिनिधी : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त किल्ले-धारूर येथील दिवाणी व फौजदारी न्यायालय परिसरात वृक्षारोपणाचा उपक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचा संदेश देत न्यायालय परिसरात विविध प्रकारच्या फळझाडांची लागवड करण्यात आली.
या उपक्रमाचे उद्घाटन किल्ले-धारूर न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश श्री. एन. एम. वाली यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच सरकारी वकील ॲड. एस. एन. थेरोकार यांच्या हस्तेही वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी न्यायालय परिसरात चिंच, आंबा, पेरू आणि जांभूळ यांसारख्या उपयुक्त व पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड करण्यात आली.
कार्यक्रमास किल्ले-धारूर वकील संघाचे अध्यक्ष ॲड. पी. पी. शिनगारे यांच्यासह वकील संघाचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी वृक्षारोपणासोबतच लावण्यात आलेल्या झाडांचे संगोपन व संवर्धन करण्याची जबाबदारी स्वीकारत पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याचे आवाहन केले.
यावेळी न्यायालयातील ॲड. निंगुळे, ॲड. अहंकारे, ॲड. गडदे, ॲड. नखाते, ॲड. फुन्ने, ॲड. ईखे, ॲड. भोसले यांच्यासह न्यायालयीन कर्मचारी होळंबे, मुंडे, मस्के, पटाईत तसेच शिपाई माने आणि अन्सार मामू आदी उपस्थित होते.
जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश देण्यात आला. वृक्षारोपणाबरोबरच झाडांची नियमित काळजी घेऊन त्यांचे संगोपन करण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला. त्यामुळे न्यायालय परिसर अधिक हिरवागार व पर्यावरणपूरक होण्यास मदत होणार असल्याचे मान्यवरांनी यावेळी सांगितले.




