शेतकरी जनहित कामगार मंचातर्फे विविध मागण्यासंदर्भात मुंबई मंत्रालयात निवेदन सादर
मागासवर्गीय विकास महामंडळाअंतर्गत येणाऱ्या थकीत लाभार्थ्यांना व सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी ही प्रमुख मागणी

मुंबई | प्रतिनिधी
शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा समजला जात असून त्यांना समाजात भक्कमपणे उभे करणे गरजेचे आहे. सध्याच्या परिस्थितीनुसार संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना बाहेर काढण्याचा एकमेव मार्ग म्हणजे सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणे होय, यासाठी शेतकरी जनहित कामगार मंच मार्फत दि.०६ ऑगस्ट रोजी मा.संस्थापक अध्यक्ष जयवंतराव कांबळे साहेब व महाराष्ट्र सचिव मा.दिपक गायकवाड साहेब यांनी महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित कृषिमंत्री दत्तात्रय भरणे साहेबांना निवेदन सादर करून शेतकऱ्यांच्या कर्जमाफी विषयी विनंती केली.
त्याचप्रमाणे दुसरीकडे मागासवर्गीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनेक महामंडळांची स्थापना करण्यात आलेली आहे. जवळजवळ सगळ्याच मागासवर्गीय विकास महामंडळांची आर्थिक परिस्थिती हलकीची असून अनेक महामंडळांना मुबलक प्रमाणात निधी उपलब्ध होत नाही. त्यामुळे मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक समाज विकासापासून दुरावला असल्याचे दिसून येत आहे. यासाठी मोठी आर्थिक तरतूद करण्याची गरज भासू लागली आहे. तसेच कर्ज घेण्यासाठी दोन जामीनदारांची अट शिथिल करण्यात यावी, यासाठी देखील निवेदनात उल्लेख करण्यात आलेला आहे. कारण बऱ्याच लाभार्थ्यांकडे आणि त्यांच्या विश्वासातील सहकार्यांकडे मॉर्गेज ठेवण्यासाठी काहीच नसल्यामुळे त्यांना कर्ज मिळणे अशक्य होत आहे. तसेच यापूर्वी कर्ज घेतलेल्या थकीत कर्जदारांना एकदा कर्जमाफी करण्यात यावी, अशी या माध्यमातून शेतकरी जनहित कामगार मंचातर्फे महाराष्ट्राचे समाज कल्याण मंत्री मा.संजय शिरसाट साहेब यांना निवेदन देण्यात आले.




