असंघटित कामगारांच्या हक्कांसाठी लढा तीव्र करणार – आझाद क्रांती सेना
गावपातळीपासून महाराष्ट्रस्तरापर्यंत संघटन बळकट करण्याचा निर्धार

माजलगाव | प्रतिनिधी:- दिनांक २५ जानेवारी २०२६ रोजी माजलगाव येथे सकाळी ११ वाजता आझाद क्रांती सेना व ॲक्शन ॲड. यांच्या संयुक्त विद्यमाने असंघटित कामगारांची भव्य कार्यशाळा उत्साहात पार पडली. या कार्यशाळेत माजलगाव तालुक्यातील आझाद क्रांती सेनेचे गावपातळीवरील प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यशाळेचा मुख्य उद्देश असंघटित कामगारांचे हक्क, अधिकार व कामगार कायदे यांची माहिती देणे, तसेच कामगारांवर होणाऱ्या आर्थिक व सामाजिक अन्यायाविरोधात लढा अधिक संघटित आणि प्रभावी करणे हा होता. या माध्यमातून गावपातळीपासून ते थेट महाराष्ट्रस्तरापर्यंत मजबूत संघटन उभारण्याचा ठाम निर्धार व्यक्त करण्यात आला.
कार्यशाळेत मार्गदर्शन करताना आझाद क्रांती सेना प्रमुख राजेश घोडे यांनी असंघटित कामगारांच्या प्रश्नांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा ठपका ठेवला. “कामगार संघटित झाले तरच त्यांचे हक्क मिळू शकतात. अन्यथा शोषणाची ही साखळी कधीच थांबणार नाही,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
कोर कमिटी सदस्य अरुण आव्हाड यांनी कामगार कायद्यांची सविस्तर माहिती देत, किमान वेतन, सामाजिक सुरक्षा, अपघात विमा, आरोग्य सुविधा यांसारख्या मुद्द्यांवर संघटनात्मक लढ्याची गरज अधोरेखित केली.
तालुकाप्रमुख अशोक ढगे, किसन भिसे सर व गणेश थोरात यांनी गावपातळीवर कामगार समित्या स्थापन करून चळवळ अधिक गतिमान करण्याचे आवाहन केले.
कार्यशाळेत शाहिर प्रदीप साळवे यांनी आपल्या प्रभावी शाहिरीतून कामगारांचे प्रश्न मांडत उपस्थितांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण केला. त्यांच्या शाहिरीने कार्यशाळेला चळवळीचा स्वरूप प्राप्त झाले.
या प्रसंगी सुदाम भिसे यांनी आझाद क्रांती सेनेमध्ये अधिकृत प्रवेश केला, ज्यामुळे संघटनेच्या ताकदीत भर पडली आहे.
ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी आझाद क्रांती सेना शहरप्रमुख शेख अकबर, तुकाराम शिंदे, बाळू ढगे, भारत गायकवाड, राजू बडवणे, गणेश शिंदे आदी कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
एकूणच, ही कार्यशाळा म्हणजे केवळ माहितीपर कार्यक्रम न राहता असंघटित कामगारांच्या हक्कांसाठी सुरू असलेल्या संघर्षाला नवी दिशा देणारा महत्त्वाचा टप्पा ठरली असून, येणाऱ्या काळात आझाद क्रांती सेना कामगारांच्या प्रश्नांवर अधिक तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे संकेत मिळत आहेत.




