सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहा — लक्ष्मण वाघमारे यांचे आवाहन
केज | प्रतिनिधी:- केज येथे दि. १३ रोजी आयोजित करण्यात आलेल्या सामाजिक न्याय मंत्री मा. संजय शिरसाट साहेब यांच्या जाहीर सभेला नागरिकांनी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्रमिक महासंघ व शिवसेना सामाजिक न्याय विभागाचे पदाधिकारी लक्ष्मण वाघमारे यांनी केले आहे.
सामाजिक न्यायाच्या विविध प्रश्नांना नवी दिशा देण्यासाठी ही सभा अत्यंत महत्त्वाची ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले. तालुक्यातील वंचित, श्रमिक, मागासवर्गीय घटकांच्या समस्या, शासकीय योजनांची अंमलबजावणी, शैक्षणिक व सामाजिक प्रश्न याबाबत मंत्रीस्तरावर थेट चर्चा होणार असल्याने नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असेही ते म्हणाले.
लक्ष्मण वाघमारे यांनी सांगितले की, ही सभा केवळ राजकीय कार्यक्रम नसून सामाजिक न्यायाच्या लढ्याला बळ देणारा एक व्यापक मंच आहे. श्रमिक महासंघ व शिवसेना सामाजिक न्याय विभागाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून, तालुक्यातील सर्व गावांमधून नागरिकांनी सहभाग नोंदवावा, असे त्यांनी आवाहन केले.
“आपणही उपस्थित राहून आपली ताकद दाखवूया आणि सामाजिक न्यायाच्या चळवळीला नवी ऊर्जा देऊया,” असे स्पष्ट आवाहन लक्ष्मण वाघमारे यांनी केले आहे.
या सभेमुळे केज तालुक्यात सामाजिक प्रश्नांवर सकारात्मक वातावरण निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.




