परळीत ‘अखिल भारतीय महा पशुधन एक्स्पो 2026’ : शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे:- शेतकरी जनहित कामगार संघटनेचे जाहीर आवाहन

परळी प्रतिनिधी:- येथे आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय महा पशुधन एक्स्पो 2026 या भव्य आणि राष्ट्रीय पातळीवरील पशुधन प्रदर्शनास शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शेतकरी जनहित कामगार संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
दि. 13 ते 15 फेब्रुवारी 2026 दरम्यान होणाऱ्या या एक्स्पोमध्ये देशभरातील उत्कृष्ट गाई-म्हशी, शेळी-मेंढी व कुक्कुटपालनातील सुधारित नसलींचे प्रदर्शन होणार आहे. तसेच आधुनिक पशुपालन तंत्रज्ञान, दुग्धव्यवसायातील नवीन संधी, पशुखाद्य, औषधोपचार व विविध कृषी-पूरक उद्योगांची माहिती एका ठिकाणी उपलब्ध होणार आहे.

संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “आजच्या स्पर्धात्मक युगात शेतीसोबत पशुपालन हा शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा आधार बनत आहे. या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचे एक्स्पो शेतकऱ्यांसाठी ज्ञानवर्धक आणि उत्पन्नवाढीसाठी उपयुक्त ठरणार आहेत.”
या प्रदर्शनातून शेतकरी व पशुपालकांना थेट तज्ञांशी संवाद साधण्याची, नवीन तंत्रज्ञान जाणून घेण्याची आणि व्यवसायवृद्धीच्या संधी शोधण्याची संधी मिळणार आहे.
म्हणूनच सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या सहकाऱ्यांसह व कुटुंबीयांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहून या पशुधन महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन शेतकरी जनहित कामगार संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.




